मनपा क्षेत्रातील शिवनी परिसरात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने मनपाच्या जलप्रदाय विभागाने जलकुंभ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी नागरी दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत २०१४-१५ व १५-१६ मध्ये प्राप्त निधीत बचत झालेल्या निधीतून १० लक्ष लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारणे व पाइपलाइन टाकण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. जलप्रदाय विभागाला प्राप्त ७.८६ टक्के जादा दराची निविदा १५ डिसेंबर राेजी आयाेजित स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आली हाेती. शिवनी येथील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
नागरिकांच्या हिताचा विषय असल्यामुळे हा विषय मंजूर करण्यास हरकत नसावी, असे मत शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी व्यक्त केले हाेते. सेनेची भूमिका लक्षात घेता सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली. दुसरीकडे नागरी दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत प्राप्त निधी व जलकुंभाच्या कामावर निधी खर्च करण्यासाठी मनपाने दिलेल्या प्रशासकीय मान्यतेवर गिरधर हरवानी यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली हाेती. प्राप्त तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शहानिशा केली असता, निधीच्या हिशेबामध्ये संदिग्धता आढळल्याचे मत व्यक्त केले हाेते. जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतर मनपाने निधीच्या तरतुदीसंदर्भात माहिती सादर केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जलकुंभाच्या उभारणीला मंजुरी दिली.
जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर
अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती याेजनेंतर्गत मनपाला मंजूर निधी व करण्यात आलेल्या विनियाेजनाबाबत नेमका बाेध हाेत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाला दिलेल्या पत्रात नमूद केले हाेते. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राची दखल घेत मनपा प्रशासनाने तातडीने अहवाल सादर केला.
जलकुंभासाठी तरतूद केलेल्या निधीच्या मुद्द्यावर जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर केला. जिल्हा प्रशासनाच्या संमतीनंतरच जलकुंभ उभारणीचा आदेश दिला आहे.
- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, मनपा