- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील सर्वच योजनांतून मंजूर घरकुल लाभार्थींना जानेवारीपासून हप्त्यांच्या देयकांची रक्कम न मिळाल्याने जिल्ह्यातील १३,८२३ घरकुले अद्यापही अपूर्ण आहेत. या घरकुलांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून ७२ कोटींपेक्षाही अधिक निधीची गरज असून, तो मिळत नसल्याने आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरकुलाची कामे अपूर्ण असल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत.‘सर्वांना घरे’ या संकल्पनेतून २०२२ पर्यंत ग्रामीण व शहरी भागातील बेघरांना घरकुले देण्याची घोषणा केंद्र शासनाने २०१६ पासूनच केली आहे. त्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील सर्वसाधारण लाभार्थींसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना, तर राज्य शासनाने अनुसूचित जाती लाभार्थीसाठी रमाई आवास योजना, आदिवासींसाठी शबरी व पारधी घरकुल योजना या दोन्ही विभागाच्या स्वतंत्र निधीच्या तरतुदीतून सुरू केल्या. ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थींनी घरकुलाचे दुसऱ्या, तिसºया हप्त्यांची देयके दाखल केली. त्यांना जानेवारीपासून निधी नसल्याच्या कारणावरून देयकच अदा होत नसल्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, हा निधी केंद्रीय पद्धतीने वाटप केला जातो.
देयक अपलोड केल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा केली जाते; मात्र आता देयकेच मिळत नसल्याने घरकुलांचे काम कधी पूर्ण करावे, ही समस्या जिल्ह्यातील ९,८४३ लाभार्थींना आहे. त्यातच आता काही दिवसांतच पावसाळा सुरू होत आहे. आधीच्या निवासाची व्यवस्था मोडून घरकुल बांधकाम सुरू केले. ते पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात कुणाकडे आश्रय घ्यावा, या विवंचनेत लाभार्थी आता धास्तावले आहेत. त्यासोबतच रमाई आवास योजनेचे ३,६४०, शबरी घरकुल-२१३, पारधी-१२७ लाभार्थींची घरकुले अपूर्ण आहेत. या सर्व घरकुल लाभार्थींनी काम पूर्ण झाल्याची देयकेही दाखल केली आहेत; मात्र गत जानेवारीपासून त्यासाठीची रक्कम खात्यात जमा होत नसल्याने घरकुलांची कामे अपूर्ण आहेत.