- संतोष येलकर
अकोला: केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार असून, या योजनेच्या अंमलबजावणीत तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम -किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम राज्यभरातील तहसील कार्यालयामार्फत शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवर ग्रामस्तरीय समित्यांकडून तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्यांची तहसील स्तरावर तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर पात्र अल्प व अल्पभूधारक शेतकºयांच्या याद्या शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करावयाच्या आहेत. आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या गावनिहाय शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम राज्यातील तहसील कार्यालयांमार्फत सुरू करण्यात आले आहे.याद्यांमध्ये अशी आहे शेतकºयांची माहिती!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्पभूधारक शेतकºयांच्या तयार करण्यात आलेल्या गावनिहाय याद्या शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या याद्यांमध्ये शेतकºयांचे नाव, गाव, जमिनीचे क्षेत्र, शेतकºयांचा बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफसी कोड नंबर, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी प्रकारच्या माहितीचा समावेश आहे.गावपातळीवर याद्या तयार करण्याचे काम सुरूच!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत गावपातळीवर अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. ग्रामस्तरीय समिती अंतर्गत तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांमार्फत शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, जमिनीचे क्षेत्र, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी प्रकारची माहिती घेऊन याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तयार करण्यात आलेल्या याद्या संबंधित तहसील कार्यालयांकडून शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात येत आहेत.