चंद्रशेखर ठाकरे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंजर : जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. या श्रमदानाचे फलित म्हणजे सर्वत्र ढाळीचे बांध तयार करण्यात आले. एवढेच नव्हे, तर गावात झालेल्या कामांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत बाश्रीटाकळी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
अभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २0१६-१७ मध्ये खेर्डा खुर्दने सहभाग नोंदवून श्रमदानची सुरुवात केली होती. ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाचा ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते त्यांना १0 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यामध्ये आठ लाख रुपयांची भर टाकली. त्यापाठोपाठ खेर्डा खुर्दवर निधींचा वर्षाव करीत आ. हरीश पिंपळे यांनी १0 लाख व या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य यांनी चार लाख रुपयांचा निधी मंजूर केला. स्पर्धेमधील जलसंधारणाच्या कामामध्ये डिप सीसीटी, विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, माती नाला बांध तसेच जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण राहिलेले १00 बाय १00 चे शेततळे श्रमदानातून पूर्ण केले व माथा ते पायथा संपूर्ण कामे ग्रामस्थ तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होऊन पूर्ण केले. खेर्डा खुर्द शिवारातील ७५२ हेक्टर जमीन क्षेत्र असून, या संपूर्ण क्षेत्रामध्ये श्रमदानातून ढाळीचे बांध खोदून पाणी थांबविण्याचा प्रयत्न झाला.
जुन्या कामाची केली दुरुस्ती जुन्या माती बंधार्याची दुरुस्ती करून पाणी थांबविले. शोषखड्डे, सिमेंट नाला बंधार्यांची दुरुस्ती करण्यात आली. संपूर्ण शेतकर्यांच्या शेतीची माती तपासणी झालेली असून, शेतकर्यांना त्याचा मोठय़ा प्रमाणात फायदा होत आहे. स्पर्धेदरम्यान १७ मे २0१७ रोजी महाश्रमदान झाले. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच मिक्स अँकॅडमी अकोला येथील ५00 विद्यार्थ्यांंनी सहभाग नोंदविला होता.
१४ एप्रिल २0१७ रोजी संपूर्ण गावाने श्रमदानातून माती नाला बांध बांधून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन जयंतीदिनी आदरांजली वाहिली. भविष्यामध्ये निर्माण होणारी पाणी समस्या लक्षात घेता, ग्रामस्थांनी महाश्रमदान करून गावाच्या प्रगतीकरिता अहारोत्र झटून विकासाचे ध्येय पूर्ण केले. यामध्ये स्वयंसेवी संस्था व शासकीय कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.- सुरेश सोनोने, ग्रामस्थ.
मी दिलेल्या हाकेला ग्रामस्थांनी ओ दिल्याने व गाव दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पनेमुळे गाव विकास कामे करीत असून, यामध्ये प्रशासक नाकारून चांगले सहकार्य लाभले.- संदीप चौधरी, सरपंच
मी दिलेल्या हाकेला ग्रामस्थांनी ओ दिल्याने व गाव दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पनेमुळे गाव विकास कामे करीत असून, यामध्ये प्रशासक नाकारून चांगले सहकार्य लाभले.- संदीप चौधरी, सरपंच