अकोला: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५३ आणि समित्यांच्या १०६ जागांच्या प्रभागरचना करण्याचे काम महसूल यंत्रणामार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १० आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास २० आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून मान्यता देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितींच्या गणांसाठी नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत २७ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतिम प्रभागरचना व आरक्षण २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सातही तालुक्यांत लोकसंख्या व भौगोलिक स्थिती लक्षात घेता, तहसील कार्यालयांमार्फत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रभागरचनेचे काम सुरू करण्यात आले आहे.लोकसंख्या व भौगोलिक स्थितीचा विचार करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांची प्रभागरचना करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.- विजय लोखंडे, तहसीलदार, अकोला