वाशिम : येथील कामगार कार्यालयामध्ये घरकाम करणार्या महिलांची शासकीय अनुदान मिळण्याकरीता नोंदणी सुरू आहे. या नोंदणीसाठी गर्दी झाल्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात आहे. या बंदोबस्तामधील एका महिला पोलिस शिपायासोबत एका मोलकरीण महिलेची आज ७ जुलै रोजी हातापायी झाली. सदर महिलेविरूध्द शहर पोलिस स्टेशनमध्ये शांततेचा भंग केल्याची कारवाई करण्यात आली. सिव्हील लाईन परिसरात असलेल्या कामगार कार्यालयामध्ये गेल्या महिनाभरापासुन घरकाम करणार्या महिलांनी नोंदणीसाठी गर्दी केली आहे. दिवसेंदिवस महिलांची गर्दी वाढत असल्याने कामगार कार्यालयाने पोलिस बंदोबस्त मागितला होता. या बंदोबस्तामध्ये दोन पुरूष पोलिस शिपाई व दोन महिला पोलिस शिपायांचा समावेश आहे. आज ७ जुलै रोजी दुपारचे सुमारास महिलांनी लोटलाट करून गोंधळ केला होता. महिलांनी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी महिलांना रांगेत लागण्यासाठी विनंती केली. मात्र, काही महिलांनी महिला पोलिसांवरच हल्ला चढविला. यामध्ये एका महिला पोलिस शिपायाला जऊळका येथील एका महिलेने सौम्य मारहाण केली. या घटनेमुळे कामगार कार्यालय परिसरामध्ये काही वेळेसाठी तणावपुर्ण वातावरण तयार झाले होते. जऊळका येथील महिलेविरूध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये शांततेचा भंग केल्याप्रकरणी कलम ११0 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
कामगार महिलांची पोलिसांना धक्काबुक्की
By admin | Published: July 07, 2014 11:50 PM