संतोष येलकर
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील राज्यात ३ लाख ५९ हजार घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. ही घरकुलांची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करावीत, अशी सूचना ‘नरेगा’च्या नागपूर येथील राज्य आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) ८ जुलै रोजीच्या पत्राव्दारे दिली आहे.
‘नरेगा’अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुलांची कामे करण्यात येतात. त्यामध्ये राज्यात सद्यस्थितीत ३ लाख ५९ हजार इतकी घरकुलांची कामे वेगवेगळ्या स्तरांवर अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने टप्पानिहाय कार्यपध्दतीचा अवलंब करून घरकुलांची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नागपूर येथील राज्य आयुक्त शान्तनु गोयल यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राव्दारे दिल्या. १५ डिसेंबर २०२०पूर्वी सुरू करण्यात आलेल्या घरकुलांच्या कामांची ग्रामपंचायत व तालुकानिहाय यादी तयार करून आणि मस्टर जनरेट करून अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत तसेच ‘नरेगा’अंतर्गत आवास योजनेतील लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, यासंदर्भात संबंधित यंत्रणांना निर्देश निर्गमित करण्याच्या सूचनाही ‘नरेगा’ आयुक्तांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राव्दारे दिल्या आहेत.
‘नरेगा’अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील अपूर्ण असलेली घरकुलांची कामे पूर्ण करण्यासंदर्भात ‘नरेगा’ आयुक्तांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ‘नरेगा’अंतर्गत आवास योजनेतील जिल्ह्यात अपूर्ण असलेली घरकुलांची कामे पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.