- अतुल जयस्वाल
अकोला : उघडी- बोडकी माळराने हिरवीगार करून त्या माध्यमातून तापमानवाढ कमी करण्याच्या उद्देशाने अकोला जिल्ह्यातील कापशी रोड येथे अवघ्या २०० फूट जागेवर स्वस्तिकच्या आकारात तब्बल एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. वृक्षलागवडीचे हे स्वस्तिक मॉडेल भारत वृक्षक्रांती मिशनचे संस्थापक ए.एस. नाथन यांच्या संकल्पनेतून तयार झाले असून, विदर्भातील हा पहिलाच प्रयोग आहे. यापूर्वी असे मॉडेल लातूर जिल्ह्यातील बातखेडा येथे साकारण्यात आले आहे. गत सहा वर्षांपासून अकोल्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविणारे भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक ए.एस. नाथन यांनी ‘ऑक्सिजन फॉर यू’ या संकल्पनेतून वृक्षलागवडीचे अनोखे मॉडेल तयार केले असून, याअंतर्गत कापशी रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात विविध प्रजातींची तब्बल एक हजार रोपटी लावण्यात आली आहेत. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या स्वस्तिकच्या आकारात १० मे ते ३ जून या कालावधीत वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी वन विभागाने विविध रोपटी पुरविली असून, वृक्षारोपणाच्या कामात ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची सहकार्य केले.
असे आहे स्वस्तिक मॉडेल
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात १०० फूट लांब व १०० फूट रुंद, असे अधिकचे चिन्ह तयार करण्यात आले. त्याला ५०-५० फुटांच्या चार बाजू जोडू स्वस्तिकचा आकार देण्यात आला. तयार झालेल्या या वाफ्यांमध्ये दर दोन फूट लांबीवर एक व एका रांगेत पाच, अशा तब्बल एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. वृक्षांची वाढ झाल्यानंतर त्यांच्या फांद्या एकमेकांत फसून एका भिंतीसारखा आकार येईल, अशी संकल्पना आहे.
२५ प्रजातींच्या वृक्षांचे रोपण
या मॉडेलमध्ये कडुलिंब, बेल, आवळा, करंज, आंबा, शिसम, चिंच, कडू बदाम, सीताफळ, रामफळ, सेमला, बदाम, अशा २५ प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. एकाच प्रजातीची झाडे जवळजवळ नसतील याची काळजी घेण्यात आली आहे.
स्वस्तिक मॉडेलमध्ये अगदी कमी जागेत मोठ्या संख्येने झाडे लावता व ती जगवता येतात. विदर्भातील हा पहिलाच प्रयोग असून, लवकरच अकोला जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांच्या परिसरात हे मॉडेल साकारण्याचा मानस आहे.
-ए.एस. नाथन, संस्थापक, वृक्ष क्रांती मिशन, अकोला