अकोला : ‘सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता, प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोषवाक्यांतर्गत यंदाचा जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात ‘ना औषध ना डॉक्टर’ अशी परिस्थिती असून, रुग्णांना महागडा उपचार घ्यावा लागत आहे.जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकासाठी सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता देण्यात आली आहे; परंतु जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची वास्तविकता यापेक्षा उलट आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय असो, वा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी डॉक्टरांचे पद रिक्त आहेत. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचा बहुतांश कारभार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर चालत आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती यापेक्षाही बिकट असून, रुग्णांना साधा प्रथमोपचारही मिळणे कठीण आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी आरोग्य सेवेची उपलब्धता करून देणे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान असेल.वैद्यकीय उपकरणे नादुरुस्तजिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त आहेत. ही उपकरणे नव्याने खरेदीसाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे; परंतु यातील बहुतांश उपकरणे अद्याप रुग्णालयांपर्यंत पोहोचलीच नाहीत. त्यामुळे रुग्णांचा उपचार नादुरुस्त उपकरणांवर सुरू आहे.रुग्णांचा भार ‘जीएमसी’वरग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा दुबळी असल्याने रुग्णांची धाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आहे. उपलब्ध सुविधांच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे.प्रत्येक रुग्णावर उपचार व्हावा, यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध आहे. विविध योजनांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केला जात आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.