लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रेल्वे स्टेशनसमोरील गुजराती स्वीट मार्ट येथून रणपिसे नगरमधील गुणवंत शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या अंतर्गत एका बैठकीसाठी उपस्थित असलेल्या महिलांना अल्पोपाहार आणण्यात आला असता यामधील समोशामध्ये चक्क गोम हा कीडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार २३ सप्टेंबर रोजी घडला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली असून, ते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.गुणवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती शिरसाट यांच्या रणपिसे नगर कार्यालयामध्ये एका बैठकीसाठी महिलांना अल्पोपाहार देण्यात आला होता. हा अल्पोपाहार रेल्वे स्टेशनसमोरील गुजराती स्वीट मार्ट येथून आणण्यात आला होता. समोसा, जिलेबी आणि ढोकळा हे तीन पदार्थ त्यांनी १ हजार ४५६ रुपये देऊन खरेदी केले.त्यानंतर गुजराती स्वीट मार्टच्या संचालकाने त्यांना २२३६ क्रमांकाचे देयकही दिले. दरम्यान, हा अल्पोपाहार करीत असताना एका महिलेच्या समोशामध्ये मेलेली गोम आढळली.सदरची गोम बघता अनेकांना धक्का बसला. त्यानंतर गुणवंत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुजराती स्वीट मार्टच्या संचालकासोबत संपर्क साधला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरत पैसे परत घेऊन जाण्याचा उलट सल्ला दिल्याचा आरोप गुणवंत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाºयांनी केला. त्यामुळे गुणवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती शिरसाट यांनी या प्रकरणाची फोटोसह तसेच सदरच्या अल्पोपाहारासह अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासन विभाग केवळ नमुने घेऊन थंड बसते की सदर हॉटेलवर कठोर कारवाई करते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
गुजराती स्वीट मार्ट येथून विकत घेतलेल्या समोसा पदार्थात गोम आढळल्याची तक्रार प्राप्त झाली असून, त्यातील नमुने घेण्यात आले आहे. तपासणी नंतर पुढील कारवाई करण्यात येईल.- रावसाहेब वाकडेअन्न निरीक्षक, अकोला