लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/वाशिम/बुलडाणा/खामगाव: पुणे जिल्हय़ातील कोरेगाव - भीमा येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अकोला, बुलडाणा, खामगाव, मलकापूर, वाशिम या मोठय़ा शहरांमध्ये संतप्त युवकांनी बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय खामगाव, अकोला जिल्हय़ातील लोहारा, अकोट, वाशिम जिल्हय़ातील कनेरगाव नाका येथे परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. लोहारा येथे बसवर झालेल्या दगडफेकीत दोन चिमुकल्यांसह पाच जण जखमी झाले. बुलडाणा शहरात संतप्त युवकांनी बाजारपेठ बंद करण्यासाठी शहरातून मोर्चा काढला, तसेच बसस्थानकावर ठिय्या आंदोलन केले. अकोला जिल्हय़ातील तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी आंदोलन करणार्या ३४ जणांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. तेल्हार्यात युवकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. बाळापूर येथेही पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
वाशिम जिल्हय़ात बंद, बसवर दगडफेक कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दगडफेकीच्या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. या पृष्ठभूमीवर व्यावसायिकांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन दुपारी १ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळला. या घटनेचे पडसाद कनेरगाव येथे उमटले. वाशिमपासून जवळच असलेल्या तथा हिंगोली जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या कनेरगाव येथे सोमवारी सायंकाळी एका बसची काच फोडल्यानंतर मंगळवारी पुन्हा सकाळी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन, निदर्शने केली. यावेळी तीन बसेस आणि एका खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास वाशिम येथे एका वाहनावर दगडफेक झाली. अज्ञात इसमांनी अकोला नाका चौकात टायर जाळला.
बुलडाण्यात एसटी बसवर दगडफेक कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ९ बसेस फोडल्या. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसेसमध्ये मेहकर आगाराच्या सर्वाधिक म्हणजे चार बसेसचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बसफेर्या खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या होत्या.