अकोल: जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल एका जळालेल्या महिला रुग्णाला उपचारादरम्यान चुकीचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रकार संबंधितांच्या लक्षात येताच बुधवारी त्या रुग्णाच्या नातेवाइकांकडून स्वत:च्या जबाबदारीवर रुग्णाला घरी घेऊन जात असल्याची लेखी हमी घेण्यात आली. या प्रकरणी संंबंधितांना विचारणा केली असता चौकशी करून सांगतो, असे उत्तर देण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २० मध्ये वाशिम जिल्ह्यातील एका जळालेल्या महिलेवर रुग्णावर उपचार सुरू होता. वॉर्डात त्या रुग्णा व्यतिरिक्त आणखी एका महिला रुग्णावर उपचार सुरू होता. तीन दिवसांपूर्वी शेजारील महिला रुग्णाला रक्त द्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु त्या रुग्णाला रक्त देण्याऐवजी वाशिम येथील रुग्णाला रक्त देण्यात आले. चुकीच्या गटाचे रक्त दिल्यामुळे वाशिम येथील महिलेला झटके येण्यास सुरुवात झाली. वाशिम येथील त्या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला. हा प्रकार लक्षात येण्यापूर्वीच संबंधितांनी रुग्णाच्या नातेवाइकांकडून स्वत:च्या जबाबदारीवर रुग्णाला घरी घेऊन जात असल्याची हमी लिहून घेतली व त्या रुग्णाला सुटी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नावाचा गोंधळज्या रुग्णाला रक्त द्यायचे होते त्या रुग्णाच्या नावाऐवजी वाशिम येथील रुग्णाचे नाव देण्यात आल्याची माहिती आहे. नावातील गोंधळामुळे हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.यापूर्वीही अशा घटनासर्वोपचार रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांच्या चुकीमुळे यापूर्वी देखील रुग्णांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. रुग्णांच्या जीवासोबत वारंवार होणारा हा खेळ थांबविण्यासाठी मात्र कुठल्याच प्रकारची ठोस कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते.
या प्रकाराची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. प्रकरणाची चौकशी करून सांगतो.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, जीएमसी, अकोला