राजरत्न सिरसाट/अकोलाविदर्भातील वायगावच्या हळदीला भौगोलिक निर्देशन(जीआय) मिळाल्याने वर्षानुवर्षाचा वनवास संपला असून, या हळदीला स्वतंत्र ओळख मिळाल्याने जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये वायगाव हळद उत्पादक शेतकर्यांचा मोलाचा वाटा आहे.वर्धा जिल्ह्यातील 'वायगाव' या नावाने संपूर्ण विदर्भात हळद प्रसिद्ध आहे. सेलम, राजापुरी, कृष्णा, फुले स्वरू पा आदी हळदीच्या जाती प्रचलित आहेत. तथापि, वायगावची हळद सात महिन्यांत येणारी असून, या हळदीमध्ये (कुरकमिन) पिवळेपणा सहा ते सात टक्के आहे. या सुवासिक हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे; परंतु या हळदीची अधिकृत नोंद कृषी विभागाच्या दफ्तरी नव्हती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन केल्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेने या हळदीला मान्यता दिली; परंतु हळद उत्पादक शेतकर्यांचे समाधान न झाल्याने नागपुरी संत्र्याप्रमाणे वायगावच्या हळदीला स्वतंत्र ओळख मिळावी, यासाठीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, चेन्नई येथील भौगोलिक निर्देशन, निबंधक कार्यालयाने या हळदीला अलीकडेच भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र दिले आहे. याकरिता या हळदीचे अनेक पुरावे शेतकर्यांना तज्ज्ञ शास्त्रज्ञांपुढे मांडावे लागले. या निर्देशनामुळे आता भेसळ तर करता येणार नाहीच, शिवाय इतरांना पेंटटसुद्धा घेता येणार नाही.विदर्भात हळदीचे क्षेत्र १२ हजार हेक्टरवर आहे. देशात १८५.३२ लाख हेक्टरवर हळदीचे पीक घेतले जाते. या क्षेत्रामधून जवळपास ७0१. ६६ टन उत्पादन मिळते. मसाल्याच्या पदार्थात हळदीचे प्रमाण २१.६ टक्के आहे. याशिवाय उत्तम गुणधर्म असलेल्या हळदीच्या पानापासून तेल काढले आहे. या तेलाला सर्वाधिक मागणी आहे. हळदी तेल औषधोपयोगी हळदीचे तेल हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उपयोगी ठरते. रक्तशुद्धी करते, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कफ कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविते, सुजीवर प्रभावी आहे, खोकला-सर्दीवर जालीम उपायकारक असून, जखम दुरुस्त करण्यास ती उपयुक्त ठरते. यामुळे शरीरातील अंतर्गत जखमा द्रुतगतीने भरून निघतात. परफ्यूममध्येही तिचा वापर करता येतो.
वायगाव हळदीचा वनवास संपला!
By admin | Published: March 09, 2016 1:59 AM