अकोला : कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल, मे महिन्यांत परीक्षा होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, तीन महिन्यांवर परीक्षा आल्या असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: १० महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन - अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून वर्ग सुरू झाल्याने १० महिन्याच्या अभ्यासक्रम सहा महिन्यात पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.
00
दहावीचा अभ्यासक्रम
यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्याने कमी केला आहे. आनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले असले तरी गणित, विज्ञान हे विषय आनलाईन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते.
00
बारावीचा अभ्यासक्रम
यंदा कोरोनामुळे बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्याने कमी केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: सात, आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नोव्हेंबर ते एप्रिल अशा सहा महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची कसरत होणार आहे.
00
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रही प्रभावित झाले असले, तरी आनलाईन पद्धतीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. २३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले आहे.
- कल्पना समाधान धोत्रे, प्राचार्य, भाऊसाहेब तिरुख विद्यालय, खिरपुरी बु.
-----------------------------
विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याबाबत नियोजन केले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून दररोज विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या विषयांवर शिकविले जात आहे.
- दीपक बिरकड, मुख्याध्यापक, श्रीमती विमलबाई शेषरावजी देशमुख, माध्यमिक विद्यालय, डाबकी.