Yashomati Thakur: 'उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत', मंत्री यशोमती ठाकूर यांचं खळबळजनक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:44 AM2021-08-22T09:44:42+5:302021-08-22T09:46:21+5:30
Yashomati Thakur: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.
Yashomati Thakur: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाही, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्या अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. यशोमती ठाकूर यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात काँग्रेस नेत्यांमधली नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
"मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढवलेले नव्हते. या कामाला ४५० रुपये मिळत होते. आपण त्यात वाढवून ११२५ रुपये केले. यासाठी किमान २५०० रुपये मिळायला हवेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवलाय. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास त्यांचीही साथ मिळेल", असं यशोमती ठाकूर कार्यक्रमात म्हणाल्या.
भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर टीका
यशोमती ठाकूर यांनी यावेळी भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर सडकून टीका केली. "देशात जोपर्यंत परिवर्तन येत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला विभागण्याचे प्रयत्न होत राहतील. घर वापसीच्या नावाखालीही हे होतं आणि मग जय श्रीराम म्हटलं जातं. आपण रामराम, सिताराम म्हणतो. एकीकडे देशात 'राम तेरी गंगा मैली हो गई'. त्या गंगेत हजारोंनी प्रेतं होती. यातून हेच दिसतं की केंद्रातील मोदी सरकार हिंदू विरोधी सरकार आहे, असं माझं ठाम मत आहे", असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.