अकोला: पोलीस मुख्यालय हॉकी मैदान येथे बुधवार, ७ आक्टोबर रोजी राष्ट्रीय हॉकीपटू प्रवीण सुखदेवराव गोपनारायण स्मृती अमरावती विभागीय शालेय हॉकी स्पर्धेतील १९ वर्षाआतील गटातील सामने घेण्यात आले. स्पर्धेत मुलींच्या गटात यवतमाळ, तर मुलांच्या गटात अमरावती संघाने विजय मिळविला. मुलींच्या गटातील अंतिम सामना अमरावती व यवतमाळ जिल्हा संघात झाला. टायब्रेकरमध्ये यवतमाळ संघाने 0-२ ने सामना जिंकला. यवतमाळ संघाच्या मोनिका नागोसे व सुमय्या रशीद यांनी सुंदर खेळप्रदर्शन करीत प्रत्येकी १ गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला. मुलांच्या गटातील अंतिम सामना अमरावती व अकोला महानगरपालिका संघात झाला. अमरावती संघाने अकोला मनपावर ६-0 एकतर्फी विजय मिळविला. अमरावतीच्या इमरान खान याने २ आणि शादाब खान याने २ गोल नोंदविले. फैज अली व सईद नावेद यांनी प्रत्येकी १ गोल केला. यवतमाळ व अमरावती दोन्ही विजेता संघ चंद्रपूर येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय संघ निवड समितीमध्ये एनआयएस कोच भूषण साळवी, चंद्रकांत लाटेकर, सुरज जोग, आर.बी.ठाकूर, संजय बैस यांचा समावेश होता. स्पर्धेत पंच म्हणून राजू उगवेकर, विजय झटाले, मयूर निंबाळकर, स्वप्निल अंभोरे, स्वप्निल कमलाकर, अक्षय निंबाळकर, मयूर चौधरी, अभिनंदन ठाकूर, सुनील आठवले यांनी काम पाहिले. स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक विवेक पारसकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, पोलीस विभाग क्रीडाप्रमुख राजू शर्मा, नरेंद्र चव्हाण, गुरू मित गोसल, सुखदेव गोपनारायण, वसंत निंबाळकर, महावीर निखार, नामदेव बहादूरकर होते.
शालेय हॉकी स्पर्धेत यवतमाळ व अमरावती विजेता
By admin | Published: October 08, 2015 1:36 AM