लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मानलेल्या सुनेनेच सासूचा यवतमाळ येथील राहत्या घरी तोंडात टॉवेल कोंबून निर्घृण खून केला व आपल्या नातेवाईक आणि त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सासूच्या मृतदेहाची अकोल्यात विल्हेवाट लावली. अंगावर शहारे आणणार्या या खुनाचा यवतमाळच्या टोळीविरोधी पोलीस पथकाने छडा लावला असून त्या सुनेसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोर्णा नदीच्या पात्रात १८ डिसेंबर रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची २७ डिसेंबर रोजी ओळख पटली असून, सुमन रामभाऊ नक्षणे (६५) रा. संकटमोचन रोड यवतमाळ असे यातील मृत महिलेचे नाव आहे. ही महिला १७ डिसेंबरच्या दुपारपासून आपल्या राहत्या घरून अचानक बेपत्ता झाली. यवतमाळ येथील टोळीविरोधी पोलीस पथकाचे फौजदार संतोष मनवर यांनी खुनाच्या या गुन्ह्याचा छडा लावून, सातही आरोपींना ताब्यात घेतले. आशा ऊर्फ विद्या आढाव (३४) रा. राजगुरू अपार्टमेंट, अहिल्यानगरी वाघापूर ही मृतक सुमन यांचा मुलगा रघू नक्षणे याच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहते. तिच्या पैशातूनच रघूने संकटमोचन रोडवर घर बांधले होते, तर तो स्वत: इतरत्र फ्लॅटमध्ये रहायचा. या मानलेल्या सुनेशी सासू सुमनचा नेहमीच वाद व्हायचा. आपण बांधलेल्या घरातून सासू एखादे दिवशी आपल्याला बाहेर काढेल, म्हणून सुनेने सासूच्याच खुनाचा कट रचून, तो आपल्या बहिणीची मुलगी प्रियंका धर्मेश पटेल (२0) रा. कृष्णनगर, सरदार चौक, अहमदाबाद गुजरात व तिचा प्रियकर अय्याज ऊर्फ बबलू खाँ पठाण (२४) रा. नेताजीनगर यवतमाळ (ह.मु. रघू नक्षणेच्या घरी) तसेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने तो तडीस नेला. मोर्णा नदीच्या पात्रात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सर्व घटना उलगडली. यवतमाळातील टोळीविरोधी पोलीस पथकाचे फौजदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात जमादार ऋषि ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आकाश सहारे, जयंत शेंडे, शिंदे, सिडाम, चांदेकर, गौरव ठाकरे, शंकर भोयर, नीलेश पाटील, राहुल जुकटवार, प्रवीण मेगरे, पोलीस शिपाई विभावरी ढवस, प्रियंका ढोके, वैशाली मेंढे, मीनाक्षी जंगले, पुनम चौबे आदींनी हा तपास यशस्वी केला.
सात आरोपींना अटक 1 - पोलिसांनी संशयावरून गुरुवारी मृतक सुमन यांची मानलेली सून आशा उर्फ विद्या आढाव (३४) रा. राजगुरू अपार्टमेंट, अहिल्यानगरी वाघापूर हिला ताब्यात घेण्यात आले. त्यासोबतच विद्याच्या बहिणीची मुलगी प्रियंका धर्मेश पटेल (२0) रा.कृष्णनगर, सरदार चौक, अहमदाबाद गुजरात, तिचा प्रियकर अय्याज उर्फ बबलू खाँ पठाण (२४) रा. नेताजीनगर यवतमाळ (ह.मु. रघू नक्षणेच्या घरी) यांनाही अटक करण्यात आली. त्यांनी विद्याच्या सांगण्यावरून सुमनचा खून केल्याचे सांगितले.2 - मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी संतोष मधुकर गद्रे (३७) रा.माळीपुरा अकोला (ह.मु. दत्त चौक, यवतमाळ), लखन ऊर्फ गोलू बंडू जेदे (२७) रा.मेडिकल क्वॉर्टर यवतमाळ, सोनू चमन चिंगारे (३५) रा.अष्टविनायक चौक, संभाजीनगर यवतमाळ, मनोज ऊर्फ मनीष अजित तेजस्वी (२५) संभाजीनगर, वाघापूर यांची मदत घेतली. या सातही आरोपींना अटक केली. 3- या आरोपींकडे मृत सुमन यांचे मंगळसूत्र आढळून आले. विद्याचे सासूशी खटके उडत होते. यावरून रघूचा विद्यासोबत नेहमीच वाद होत होता. कुटुंब आपल्या पैशावर उदरनिर्वाह करत असताना केवळ सासूचा अडसर होता.
मृतदेह पोत्यात बांधला, बॅगमध्ये भरुन हलविला १७ डिसेंबर रोजी दुपारी यवतमाळ येथील संकटमोचन परिसरातल्या राहत्या घरी आशा, प्रियंका व बबलूने सुमन यांच्या तोंडात टॉवेल कोंबून त्यांचा खून केला. त्यानंतर सुमन यांचा मृतदेह पोत्यात बांधून दुचाकीवर संभाजीनगरातील मित्राच्या खोलीवर नेला. यावेळी मित्र दारू पित बसले होते. त्यांना एकूण प्रकरण सांगितले व मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर चर्चा केली. त्यातीलच संतोष गद्रे हा मूळ अकोल्याचा आहे. यवतमाळातील भाजी मंडीत तो स्वीपरचे काम करतो. त्याला अकोल्याची माहिती असल्याने सोबत घेण्याचे ठरले. मित्रांनीच नेताजीनगरातील एक चारचाकी वाहन भाड्याने केले. प्रकरणाबाबत या वाहनाच्या चालकाला पूर्णत: अनभिज्ञ ठेवण्यात आले. वाहन येईपर्यंत बबलूच्या मित्रांनी सुमन नक्षणे यांचा मृतदेह एका बॅगेत भरला. वाहन येताच बॅग त्यात टाकून सर्व मित्र अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.
रात्री त्यांनी मूर्तिजापूरनजीक काही अंतरावर पेट्रोल पंप असलेल्या ढाब्यावर जेवण केले. हे जेवण सुरू असतानाच एकाने बॉटलमध्ये पेट्रोल आणून वाहनात ठेवले. नंतर ते सर्वजण पुढे अकोल्याकडे निघाले. मोर्णा नदी पात्रात लघुशंकेसाठी वाहन थांबविण्यात आले. यावेळी पद्धतशीरपणे वाहनातून मृतदेह असलेली बॅग व पेट्रोलची बॉटल खाली काढण्यात आली. त्यानंतर हे वाहन चहा आणण्यासाठी पुढे पाठविण्यात आले. दरम्यानच्या काळात मोर्णा नदीच्या पात्रातील एका नाल्याच्या काठावर सुतळीचा गठ्ठा व केरकचरा टाकून सुमन यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला.
दुसर्या दिवशी या मृतदेहाची ओळख पटली. यवतमाळ पोलिसांनी या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात महत्त्वाची भूमिका वठविणार्या संतोष मधुकर गद्रे (३७) रा.माळीपुरा अकोला (ह.मु. दत्त चौक, यवतमाळ), लखन ऊर्फ गोलू बंडू जेदे (२७) रा.मेडिकल क्वॉर्टर यवतमाळ, सोनू चमन चिंगारे (३५) रा.अष्टविनायक चौक, संभाजीनगर यवतमाळ, मनोज ऊर्फ मनीष अजित तेजस्वी (२५) संभाजीनगर, वाघापूर यांना अटक केली आहे. या प्रकरणात सुमन नक्षणे हरविल्याची तक्रार येथील वडगाव रोड पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर अपहरण, खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा रामदासपेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.