अकोला: जमिनीची वाढलेली धूप, ग्लोबल वार्मिंगचा परिणाम आणि पर्यावरणाच्या ढासळत्या असमतोलामुळे मनुष्याला फटका बसत आहे. दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस हा सर्व परिणाम वृक्षांची होत असलेल्या अवैध कत्तलीमुळे होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने यंदा पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षीप्रमाणे वृक्षारोपण मोहिमेमध्ये माध्यमिक शिक्षण विभागसुद्धा सहभागी होणार असून, त्यांतर्गत माध्यमिक शाळांना १0 हजारांवर खड्डे खोदण्याचे ‘टार्गेट’ देण्यात येणार आहे.राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सर्वच शासकीय विभाग सहभागी होणार आहेत. १ ते ३१ जुलैदरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागसुद्धा सहभागी होणार असून, त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाला गतवर्षीप्रमाणेच यंदासुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेला २0 खड्डे खोदण्याचे टार्गेट देण्यात येणार आहे. शाळांनी जुलै महिन्यातील वृक्षारोपण मोहिमेच्या दृष्टिकोनातून नियोजन करून खड्डे खोदण्याचे काम सुरू करावे, खोदलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. दिलेले टार्गेट प्रत्येक शाळेने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार यांनी केले आहे. या खड्ड्यांमध्ये शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थी व शिक्षकांच्या नावे वृक्षारोपण करण्यात येणार आहे, तसेच या वृक्षांच्या देखभालीचीसुद्धा जबाबदारी शाळांवर सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)