अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदाच्या १४३ जागांसाठी २९४३ अर्ज कृषी विद्यापीठाला प्राप्त झाले असल्याने, नोकर भरती निवड समितीच्या देखरेखीत कृषी विद्यापीठ प्रशासनाने या अर्जाची छाननी सुरू केली आहे. या छाननीनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून, या सर्व प्रक्रीयेला एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. पंधरा दिवसापूर्वी नोकरभरतीचे आदेश धडकल्यानंतर भरती प्रक्रिया निवड समितीने राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठांमध्ये भरती प्रक्रियेला सुरू वात केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दोन हजाराच्यावर रिक्त पदे आहेत. तथापि, भरती प्रक्रियेत अनेक अडथळे येत गेल्याने नोकरभरतीचा अनुशेष वाढतच गेला. एक वर्षापूर्वी कृषी विद्यापीठ प्रशासनाने काही रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढली होती; परंतु या नोकर भरतीला विलंब झाला होता. पंधरा दिवसापूर्वी शासनाने नोकर भरती करण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याने एक वर्षापासून रखडलेली ही रिक्त पदे भरण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. शासनाने काढलेल्या आदेशात कनिष्ठ व वरिष्ठ साहाय्यक संशोधकापर्यंतची पदे जुन्याच पद्धतीने भरण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना मिळाल्याने कृषी विद्यापीठ स्तरावर नोकर भरती निवड समित्या गठीत करण्यात आल्या असून, समिती अध्यक्षाच्या देखरेखीत प्राप्त अर्जाची छाननी सुरू झाली आहे. डॉ. पंदेकृविच्या शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी २९४३ अर्जाची छाननी प्रशासन स्तरावर सुरू असून एक महिन्यात सर्व प्रक्रिया आटोपण्याची शक्यता वर्तवली आहे. - सर्वाधिक अर्ज ह्यजेआरएह्णसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वरिष्ठ, कनिष्ठ संशोधन साहाय्यक व इतर पदे भरण्यात येणार असल्याने सर्वाधिक १६00 च्या जवळपास उमेदवारांनी कनिष्ठ संशोधन साहाय्यक (जेआरए) पदासाठी अर्ज केले आहेत. ९0 अर्ज वरिष्ठ संशोधन साहाय्यक (एसआरए) पदासाठी केले आहेत. - ८३ बडतर्फ कर्मचार्यांचे अर्ज भरती प्रक्रियेतील अनियमीततेमुळे विद्यापीठाचे ८३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले होते. विद्यापीठाने सहा महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया राबवून या ८३ कर्मचार्यांना संधी द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने या नोकर भरतीसाठी ८३ बडतर्फ कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन साहाय्यकांनी अर्ज केले असून, आता हे सर्व कर्मचारी मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहेत.
कृषी विद्यापीठाची नोकर भरती एक महिन्यात
By admin | Published: November 30, 2014 10:22 PM