राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त शाळा मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गत वर्षी शाळा परिसरात येलो लाईन उपक्रम राबविण्यात येणार होता, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळा बंद होत्या. आता जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यभरात ‘येलो लाईन’ उपक्रम हाती घेण्यात आला. या अंतर्गत अकोला जिल्ह्यातील ७५ शाळा निवडण्यात आल्या असून, या शाळांपासून १०० यार्ड परिसरास तंबाखू प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्याची ओळख पटावी यासाठी शाळांच्या परिसरात तंबाखू प्रतिबंधीत क्षेत्र, असे लिहिलेली ‘येलो लाईन’ मारण्यात आली. अकोल्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, शाळांच्या १०० यार्ड परिसरात ‘येलो लाईन’ आखण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच शाळा व महाविद्यालयात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यामुळे होण्याऱ्या दुष्परिणामाचे फलक लावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. अकोल्यात या उपक्रमाची सुरुवात सीताबाई कला महाविद्यालयातून करण्यात आली. यासाठी तंबाखु नियंत्रण कार्यक्राचे जिल्हा समन्वयक धम्मसेन सिरसाट व त्यांचे पथक कार्यरत आहे.
रस्त्यांअभावी अनेक शाळा वगळल्या
राज्यातील अनेक शाळांसमोर पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे अशा परिसरात ‘येलो लाईन’ आखणे शक्य नाही. त्यामुळे अशा शाळांना येलो लाईन उपक्रमातून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शाळांमध्ये केवळ तंबाखू विषयी जनजागृती केली जाणार आहे.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध भागातील शाळांमध्ये ‘येलो लाईन’ उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अंतर्गत शाळांचा परिसर तंबाखू प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला