अकोला : १० एप्रिल नंतर पुढच्या पाच दिवसात एकही रूग्ण आढळून आला नसल्याने आपले अकोला कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली मात्र २६ एप्रिल रोजी आणखी एका रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले अन् या रूग्णाच्या संपर्काची साखळी लक्षात घेता अकोलेकरांच्या उरात धडकी भरली. कोरोनाचे संकट मोठे आहे. केवळ एका व्यक्तीने किंवा परिवाराने किंवा एका परिसराने काळजी घेऊन चालणार नाही तर सर्वांनीच काळजी घेतली तर आपण कोरोनाला हरवू शकतो.कोरोना’च्या विरोधातील लढाईसाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्याकरिता नागरिकांनी घरात राहणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच राज्य शासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे; परंतु सकाळच्या वेळी काही अति हुशार महाभाग घराबाहेर पडतातच. सकाळपासून उपद्रवी मंडळींकडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पाहून पोलिसांनी कडक धोरण अवलंबिल्यामुळे बुधवारी त्याचे चांगले परिणाम दिसून आले. सकाळीच भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी नियंत्रणात दिसली. मात्र किराणा खरेदीसाठीही अनेक दुकांनावरची रीघ अजूनही कमी होण्याची चिन्हे नाहीत त्यामुळे अकोलेकरांनी संयमाने घेण्याची गरज आहे. काही अकोलेकर अतिशय सुज्ञ आहेत. त्यांच्या कृतीचे कौतुक केलेच पाहिजे; मात्र काही महाभागांना अजूनही भान नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शासनाने दिलेली सवलत लक्षात घेता या खरेदीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळला जातो. पण गर्दी किती करणार, याचाही प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.
दूध, भाजीपाला, औषधी मिळणारच!जीवनावश्यक सर्व वस्तू, औषधे, दूध, किराणा, भाजीपाला आणि फळांची दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे कुणाचीही गैरसोय अथवा कुचंबणा होणार नाही मात्र त्यासाठी गर्दी करणे टाळण्याची गरज आहे.
लक्षणे लपूव नकासध्या कोरोनाच्या रूग्णांमुळे शहरातील कृषीनगर परिसरातील न्यु भिम नगर, सिंधी कॅम्प, जेएमडी मार्केट सील करण्यात आले आहे. या परिसरात व या व्यतिरिक्तही शहरातील इतर भागांमध्ये कोरोनासदृष्य लक्षणे असली तर ती न लपविता आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याची गरज आहे. लक्षणे लपवली अन् आजार वाढला तर त्या रूग्णाच्या परिवारासोबतच आपण संपूर्ण समाजाला धोक्याच्या उंबरठयावर नेऊन ठेवत आहोत याचे भान ठेवण्याची गरज आहे.