पातूर : वय झालं, रस्त्याने आधार घेत चालावे लागते. हात थरथरतात. अशा वृद्धांना श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘होय..आम्ही जिवंत आहोत...’याचा पुरावा देण्यासाठी पातूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
पातूर तालुक्यातील ८६ गावांमध्ये श्रावण बाळ योजने अंतर्गत ५००४ आणि संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेचे २५१८ लाभार्थी शासनाच्या मानधनावर जीवन चरितार्थ चालवितात. त्यांचे अनुदान नियमित चालू राहावे. यासाठी त्यांना जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. अनेक वृद्ध स्त्री-पुरुषांना पातूर तहसील कार्यालयातील संबंधित विभागात पुरावा देण्यासाठी स्वतः उपस्थित राहावे लागत आहे त्याबरोबरच आधार कार्ड आणि पासबुकची झेरॉक्स द्यावी लागते. उपरोक्त योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी पातूर तालुक्याच्या ८४ गावांमध्ये आडवळणाच्या दुर्गम भागात राहतात. त्यांचे वय झाले, चालताना दम भरून येतो. हातपाय लटपटतात. अशांना तहसील कार्यालयाच्या संबंधित विभागांमध्ये उंबरठे झिजवावे लागते. जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी निराधार वयोवृद्धांना बोलावले जात असल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वयोवृद्धांना तहसील कार्यालयात बोलावून दिवसभर थांबवून, ताटकळत बसावे लागत आहे. याकडे जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी लक्ष द्यावे आणि वृध्दांना होणारा त्रास, त्यांची पायपीट थांबविण्याची मागणी होत आहे. वृद्धांना घरपोच सेवा देण्यासाठी, अनेक खासगी संस्था पुढाकार घेतात. मात्र सरकारी व्यवस्था निराधार वृद्धांच्या जीवावर उठली आहे, असे चित्र तहसील कार्यालयात दिसून येते.
फोटो: