अकोला : मन निरोगी असेल तर कोणत्याही आजारावर मात करता येते. कोरोनाकाळात प्राणायामचे महत्त्व आणखी वाढले आहे. विशेष म्हणजे, ऑक्सिजनची कमतरता भासत असलेल्या रुग्णांसाठी योग संजीवनी ठरला आहे. यावेळी मकरासन क्रिया १, कच्छवा आसन व वशिष्ट प्राणायाम करण्याचा सल्ला योग तज्ज्ञांनी दिला. कोरोनामुळे प्रत्येक जण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाला आहे, तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण बाधित झाले. यावेळी जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनच्या समस्येचा सामना करावा लागला. कोरोनाबाधित झाल्यानंतर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन सिलिंडरही मिळत नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची चांगलीच धावपळ उडत होती. यावेळी प्राणायामने संजीवनी औषधाचे काम केले. ऑक्सिजनची वाढती समस्या पाहता अनेक रुग्णांनी योगाच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढविली. मकरासन केल्यास ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते. यावर नेमका कोणता योग प्रभावी ठरेल, याकरिता योग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे प्रमाण वाढले होते.
कोरोनामुक्त झाल्यानंतरही प्राणायाम महत्त्वाचे
कोरोनाविरोधातील युद्ध जिंकल्यानंतर, पूर्ववत आयुष्य जगण्याची खरी लढाई सुरू होते. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या फुप्फुसांना इजा होण्याची प्रकरणे वाढली आहेत. या रुग्णांना दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा यासारखे त्रास सुरू झाले आहेत. यावर संजीवनी म्हणून प्राणायाम महत्त्वाचा ठरू लागला आहे.
ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास बालासन
रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तो बालासन (उशांचा वापर करून) पद्धतीचा उपयोग करू शकतो, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांसाठी हे आसन खूपच उपयुक्त ठरले. यामुळे आयसीयूमध्ये राहणाऱ्या रुग्णांमध्ये चांगले फायदे दिसून आले. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास रुग्णांकडून बालासन (प्रोनिंग) पद्धतीचा वापर करण्यात आला.
कोरोनाकाळात प्राणायाम फुप्फुस निरोगी ठेवण्यास मदत करते. कच्छवा, वशिष्ट प्राणायाम ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास फायदेशीर आहे. या प्राणायामबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांनीही वारंवार विचारणा केली होती. यामधील मोठ्या प्रमाणात घरीच बरे झाले.
- मनोहर इंगळे, योग तज्ज्ञ
कोरोनाबाधित असल्याचे कळताच रुग्णालयात भरती झाले. यावेळी डॉक्टरांच्या उपचाराबरोबर ऑक्सिजन वाढीसाठी प्राणायाम केेले. यामध्ये भस्त्रिका, कपालभाती प्राणायाम महत्त्वपूर्ण ठरले. दररोज प्राणायाम केल्याने आजार आणखी गंभीर झाला नाही व मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
- लीना आर्या, अकोला