- प्रवीण खेतेअकोला: स्तन कर्करोगाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र संकोच किंवा मनातील भीतीमुळे बहुतांश महिला तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे महिलांना स्वत:च स्तन कर्करोगाची तपासणी करता यावी, या दृष्टिकोनातून रोटरी क्लब गावागावात महिलांना प्रशिक्षण देणार आहे.स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगापैकी ३३ टक्के कर्करोग हा स्तनांचा असतो. स्तनात येणाºया गाठीपैकी फक्त १० टक्के कर्करोगाच्या असतात. दुर्दैवाने कर्करोग हा न दुखणारा असल्याने स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय संकोच, मनातील भीती आणि काळजीमुळे स्तन कर्करोगाची तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्यात येतो; मात्र ही वृत्ती कालांतराने घातक ठरू लागते. कर्करोग वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा मृत्यू होतो. यावर नियंत्रणासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मदतीने रोटरी क्लब आॅफ अकोलातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत तज्ज्ञ डॉक्टर गावखेड्यात जाऊन महिलांना स्तन कर्करोगाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय, स्तन कर्करोगाची गाठ कशी ओळखावी, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही या उपक्रमांतर्गत दिले जाणार आहे.असे ओळखा लक्षणे
- स्तनात किंवा बगलेत गाठ
- स्तन काळे किंवा लालसर होणे
- स्तनाचा आकार बदलणे
- स्तनाची त्वचा आत ओढली जाणे
- स्तनाला खाज सुटणे
- १५ दिवसांपेक्षा स्तनाची जखम भरली न जाणे
- स्तनातून पाणी किंवा रक्तस्त्राव होणे
तपासणी केव्हा कराल?
- मासिक पाळी आल्यानंतर आठवड्याच्या आत तपासणी करावी.
- महिन्यातून किमान एक दिवस ही तपासणी करावी.
- स्तन कर्करोगाची लक्षणे आढळताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अशी राबविली जाईल मोहीमउपक्रमांतर्गत जिल्ह्यातील कुठल्याही भागातून स्तन कर्करोग प्रशिक्षण शिबिराची मागणी झाल्यास त्या ठिकाणी विशेष शिबिर राबविण्यात येईल. शिबिरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महिला व मुलींना स्तन कर्करोगाविषयी मार्गदर्शन तसेच स्वत: स्तन कर्करोगाची तपासणी कशी करावी, या विषयी प्रशिक्षण दिले जाईल.
बहुतांश स्त्रिया स्तन कर्करोगाच्या तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यांच्या मनातील भीती कमी करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना स्वत:च स्तन कर्करोगाची तपासणी करता यावी, या दृष्टिकोनातून ‘रोटरी क्लब आॅफ अकोला’तर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून स्त्रियांच्या हाकेला प्रतिसाद देत रोटरी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे.- डॉ. आशा निकते, प्रकल्प प्रमुख, रोटरी स्तन कर्करोग स्वतपासणी कार्यशाळा, अकोला