पातूर: शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोनाला तालुक्यासह शहरातून हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातून नगर परिषदेने पावले गतीने उचलणे सुरू केली आहेत. आता आठवडी बाजारात कुठल्याही व्यापाऱ्याला आता तपासणीशिवाय दुकान लावता येणार नाही, असे निर्देश नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी नुकतीच एका पत्राद्वारे दिले आहेत. त्यामुळे पातूर शहरातील आठवडी बाजारात येणाऱ्या शहरातील तसेच तालुक्यातील व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी तात्काळ करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. ५ एप्रिलपासून आठवडी बाजाराला सुरुवात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. बाजारात गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात दुकान लावण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी कोरोनाचा चाचणी करणे आवश्यक केले आहे. कोरोना तपासणीसाठी येथील प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एकमध्ये दि.५ एप्रिल आणि दि.६ एप्रिल सकाळी १० ते दुपारी ३ वाजतापर्यंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील तसेच तालुक्यातील व्यापाऱ्यांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पातूर नगर परिषदेअंतर्गत आतापर्यंत १०२ बाधित रुग्ण निघाले होते, यापैकी तिघांचे मृत्यू झालेले आहे. या धर्तीवर पातुर नगर परिषदेने ठोस आणि कठोर पावले उचलली असून, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली आहे. व्यापाऱ्यांनीही तपासणी करून घ्यावी, असे आव्हान पातुर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा न.प.च्यावतीने देण्यात आला आहे.
तीन पथके ठवणार ‘वॉच’
नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये एक नुकतीच कर्मचाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तीन पथकांची नेमणूक करण्यात आली असून, ही पथके या आठवडी बाजारात लक्ष ठेवणार असल्याची माहिती आहे.