अकोला : वापरलेल्या विजेचे पैसे भरावेच लागतील, असे ठणकावून सांगताना जे ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी बोरगाव मंजू येथे दिला. डॉ. राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, महापौर अर्चना मसने, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, प्रमोद डोंगरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर, काँग्रेस अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र करवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
नामदार डॉ. राऊत पुढे म्हणाले, कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करण्यात आला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले, याची आम्हाला कल्पना आहे; पण जर वीज वापरली असेल, तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावेच लागतील. वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
नवीन उपकेंद्रांचा ३३ गावांना लाभ
अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे प्रत्येकी एक रोहित्र उभारण्यात आले आहे. नवीन वीज उपकेंद्रामुळे २२ गावांतील सुमारे १० हजार वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. बोरगाव मंजू वीज उपकेंद्रामुळे बोरगाव, वाशिंबा, सिसा, सोनाळा गावांतील ३,५०० वीज ग्राहकांना खात्रीशीर वीजपुरवठा मिळणार असून, वाणीरंभापूर येथील वीज उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. कोथळी वीज उपकेंद्रांमुळे कोथळी खुर्द आणि बुद्रुक, हळदोली, उजळेश्वर, देवधरी, वरखेड, धानोरा, दातारखेड, फेट्रा, साखरवीरा, तिवसा, टिटवा या गावांतील सुमारे ३,२०० वीज ग्राहकांना लाभ होणार असून, जलालाबाद आणि दाभा वीज उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. घोटा वीज उपकेंद्रांमुळे घोटा, विरहित, कानडी, मोझर, पिंपळगाव चांभारे, पाराभवानी या गावांतील ३ हजार वीज ग्राहकांना लाभ होणार आहे, तर पिंजर वीज उपकेंद्राचा भार कमी होणार आहे.