अकोला - डाबकी रोडवर नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला तीनचाकी गाडी थांबवून उभ्या असलेल्या युवकास भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या अपघातात युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. प्रभाकर नामदेव ढेरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी महेंद्र उमाळे असे ट्रकचालकाचे नाव आहे.डाबकी रोड जकात नाक्यासमोरील रस्त्याच्या वळणावर प्रभाकर नामदेव ढेरे हे तीनचाकी हात गाडी घेवून उभे होते. या रस्त्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी ट्रक रेती, गिट्टी घेवून ये-जा करीत आहे. गिट्टी टाकून ट्रक क्रमांक एम.एच. ३० एव्ही ८०५ हा मुख्य रस्त्यावर येत असताना ट्रकने वळण घेतले. प्रभाकर ढेरे यांच्या जवळून ट्रक जात असताना ट्रकची जबर धडक त्यांना लागल्याने त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालक ट्रक सोडून डाबकी पोलिस ठाण्यात गेला. हा ट्रक रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचा असल्याची माहिती आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दी कमी केली. तसेच मृतक ढेरे यांचा मृतदेह एका अॅपेमध्ये सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आला. राहुल प्रभाकर ढेरे यांच्या तक्रारीवरुन डाबकी रोड पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३०४ अ, सहकलम १८४ मोटार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकास ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 7:03 PM