अकोला: येत्या काळात भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. जगात सर्वाधिक तरुणांची संख्या ही भारतातील राहणार आहे. त्यामुळे युवाशक्तीने व्यसनांच्या नादी न लागता, देशाच्या विकासात हातभार लावावा आणि विधायक कार्यासाठी पुढे यावे, तरच भारत ही महाशक्ती म्हणून उदयास येईल, असा सूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी संमेलनात रविवारी आयोजित युवक संमेलनातील वक्त्यांनी लगावला.युवक संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील प्रसिद्ध कवी अंकुश आरेकर होते. प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष वानखडे, शेतकरी जागर मंचाचे संयोजक प्रशांत गावंडे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, अशोक पटोकार, प्रा. डॉ. संतोष हुशे, अक्षय राऊत, प्रा. प्रसन्नजित गवई, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश बेले, श्याम राऊत व गणेश कंडारकर होते. श्याम राऊत यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले राष्ट्रहिताचे कार्य युवकांनी केले पाहिजे. देशासाठी तरुणांनी पेटून उठले पाहिजे, तरच देशातील अराजकता कमी होणार असल्याचे मत व्यक्त केले. विठ्ठल सरप यांनी युवाशक्तीला सकारात्मक दिशा देण्याची गरज असल्याचे सांगत गलेलठ्ठ पगार, पद, प्रतिष्ठा यापेक्षा शेतीकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत मांडले. प्रा. प्रसन्नजित गवई यांनी युवकांचा सर्वांत जास्त वेळ मोबाइलवर जात असल्याने त्याची क्रयशक्ती कमी होत आहे. युवकांनी अशा बाबींपासून दूर राहून वेळेचा सदुपयोग राष्ट्रहितासाठी करावा, असे मत मांडले. संग्राम गावंडे यांनी युवकांनी जागरूक राहून रचनात्मक कार्य करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. अक्षत राऊत यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत असणारा युवक घडविण्यासाठी समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. असा संदेश यावेळी दिला. कपिल ढोके यांनी युवकांनी कृषी क्रांतीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. कवी अंकुश आरेकर यांनी कवितांच्या माध्यमातून विचारांचा जागर केला. त्यांनी महाराष्ट्रात गाजलेली कविता ‘बोचलं म्हणून’ सादर केली. कार्यक्रमात शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे यांचा सन्मान करण्यात आला. अपघातात जखमी झालेल्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या संभाजी काळे (६) याचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पवन गवळी यांनी संचालन माणिक शेळके यांनी केले. आभार शुभम वरणकार यांनी मानले.
पालकमंत्र्यांची महोत्सवाला भेटपालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला भेट दिली आणि राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला हार्रापण करून अभिवादन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत अॅड. मोतीसिंह मोहता, डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी व आशिष ढोमणे होते.सर्वधर्मीय प्रार्थनेने महोत्सवाचा समारोपसर्व संत स्मृती मानवता दिन तथा सर्वधर्मीय प्रार्थना म्हणून सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वधर्मीय प्रार्थनेने या सोहळ्याची संगीतमय सुरुवात करण्यात आली. आर. वाय. शेख गुरुजी यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या सामूहिक मौन श्रद्धांजली कार्यक्रमात सर्वधर्मीय प्रार्थना होऊन गुरुदेवांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्यात आली. निवेदन कोमल हरणे हिने केले तर सहाव्या वर्गातील विद्यार्थी अक्षय गावंडे याने साथ दिली. रात्री व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराज यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने महोत्सवाचा समारोप झाला.