जऊळका : परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, काही शेतकरी पेरणीसाठी शेतीची मशागत करून बसले आहेत. परंतु १५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. पाऊस येत नसल्यामुळे वरूर जऊळका येथील युवकांनी धोंडी धोंडी पाणी दे...असे म्हणत, गावात घरोघरी धोंडी मागितली आणि भंडाऱ्याचे आयोजन केले होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून या भागातील शेतकरी सतत पावसाची वाट पाहत आहेत. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतातील मशागत झाली आहे. पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. घरात बी-बियाणे, रासायनिक खते भरून ठेवली आहेत. परंतु पाऊसच येत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदाचेही वर्ष दुष्काळात जाते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहेत. मृग नक्षत्रापासून पावसाचे आगमन झाले नसल्यामुळे शेतकरी सातत्याने पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आलेला नाही. परिणामी पेरणी उशिरा होणार की काय असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत. मागीलवर्षी सुद्धा पावसाने वेळेवर हुकावणी दिल्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे उत्पन्न घसरले होते. येणाऱ्या दहा दिवसांत पाऊस न आल्यास उडीद, सोयाबीन पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाऊस लवकर येण्यासाठी खारपाणपट्ट्यातील युवकांनी गावात घरोघरी फिरून धोंडी धोंडी पाणी दे....अशी प्रार्थना करीत, गावात मिरवणूक काढली आणी धोंडी मागितली.
फोटो:
मृग नक्षत्रापासून परिसरात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेली. येणाऱ्या पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात कमालीची घट होणार आहे.
-दत्ता पाटील ओंळबे, शेतकरी खापरवाडी बु.
फोटो: