बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर होऊन शेतशिवारात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत वाघ, बिबट, माकडे, नीलगाय आदी वन्य प्राणी शिरल्याच्या घटना आपण नेहमीच पाहत आहोत. पर्यावरणाचा खरा ऱ्हास हा जंगलतोडीमुळेच आहे. पर्यावरणाची ही हानी भरून काढायची असेल तर झाडे लावून जगविणे आणि जंगलाचे संवर्धन करणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. एकेकाळी महाराष्ट्र हे ‘महावनराष्ट्र’ होते. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी वृक्षांना सोयरे संबोधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा वृक्षलागवड व संवर्धनाबाबत स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोड करण्यावर सक्त बंदी घातली होती; परंतु कालांतराने मात्र आपण वनांचे महत्त्व जाणून घेण्यात व त्यांचे संवर्धन करण्यात कमी पडलो. भारतासारख्या कृषिप्रधान राष्ट्रात तर वनांचे महत्त्व अधिक आहे. वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे त्यांना शेतकी अर्थव्यवस्थेत मोलाचे स्थान आहे. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समुद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला असतानाच एकेकाळी उन्नत असलेले मेसापोटेमिया, सिरिया व पॅलेस्टाइन आदी सुपीक प्रदेश अविवेकी वनसंहाराने उजाड झाले आहेत. हवामान बदलांशी जुळवून घेणे, तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वनपरिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते.
..............
आपल्या राज्याला, ‘महावनराष्ट्र’ करण्यासाठी वनसंवर्धनाबरोबर जैवविविधता जतन करणे गरजेचे आहे. ‘वृक्षवल्लीं’ना आपले आप्तस्वकीय मानून त्यांना आधार देणे हे निसर्गकार्य जगातल्या प्रत्येक नागरिकाने करावे, त्याशिवाय नद्या, नाले नि झरे खळखळून वाहणार नाहीत.
...................................
यादव तरटे पाटील
सदस्य महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ