- राजेश शेगोकार
अकोला : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर युतीधर्म संपणार असे स्पष्ट झाले असतानाच त्याची सुरवात झाल्याचे प्रत्यंतर शिवसेनेने भाजपाच्या धोरणांविरोधात विदर्भात लावलेल्या पोस्टर्स मधून आले आहे. ‘ही तुमची शिवसेना ...हा आपला भाजपा’ अशी कॅच लाईन दर्शवित भाजपाला कमी दाखविण्याचा प्रकार सेनेने सुरू करून भाजपाच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.गत विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेला कमी लेखण्यात भाजपाने कुठेही कसुर केली नाही. दूसरीकडे सेनेने प्रत्येक वेळी सरकारला इशारा देत वेळ मारून नेली व थेट सरकारच्या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलनाची भूमिकाही घेतली. त्यामुळेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष व शिवसेना स्वतंत्र लढणार, हे संकेत होतचे ते आता स्पष्अ झाले आहे. या पृष्ठभूमीवर सेनेने ^भाजपच्या विरोधात पोस्टर वॉर सुरू करून त्यांचे रणशिंग फुंकले असून त्यासाठी शहिदांचा आधार घेतला आहे.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन मंडळाकडून राबवली जात असलेली दिवंगत बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना व काश्मीर मध्ये भाजपा व पिडीपा सरकारने काश्मिरात लष्करी अधिकारी, कर्मचा-यांवर गुन्हे नोंदविल्याची घटना याची तुलना पोस्टरवर केली आहे. शहीद कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी व प्रवासातील सवलतीची घोषणा यातून शिवसेनेने शहिदांच्या प्रति व्यक्त केलेली भावना अधोरेखीत करतानाच भाजपाचा सहभाग असलेल्या सरकारने कश्मिरातील लष्कराविरोधातील केलेल्या कारवाईचा निषेध पोस्टरमधून केला आहे. हे पोस्टर विदर्भातील सर्वच जिल्ह्यात प्रामुख्याने झळकले आहेत.भाजपा आणि शिवसेनेने १९८९ पासून महाराष्ट्रात युती करूनच प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविली. अपवाद फक्त २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचा! त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवायची म्हटल्यास, १९८९ पासून ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवलीच नाही, त्या मतदारसंघांमध्ये प्रबळ उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान भाजपापेक्षा शिवसेनेसमोर अधीक आहे.पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भातील वाटचाल सेनेसाठी अधिकच खडतर आहे. लोकसभेचा रामटेक व विधानसभेचा वरोरा मतदारसंघ वगळता, सेनेला पूर्व विदर्भात मोठी कसरत करावी लागणार आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा व वाशिम-यवतमाळ हे तीन लोकसभा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहेत पूर्व विदर्भात मात्र रामटेक वगळता सेनेला कधीच यश लाभले नाही. त्यामुळे आता प्रबळ झालेल्या भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने अशा पोस्टर वॉर मधून तयारी केल्याचे दिसत आहे.