रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने, वाडेगाव युवक शैलेश मापारी यांनी १० मे सोमवार रोजी आत्मदहनाचा इशारा कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग यांना निवेदनातून दिला होता. त्यानुसार, सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास बेसिक शाळेच्या मोबाइल टॉवरवर चढून शैलेश मापारी यांनी आंदोलनास सुरुवात केली.
अकोला-वाडेगाव रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत २० एप्रिल रोजी निवेदन दिले होते. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने मागणी केली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकांचा अपघात होऊन अपंगत्व आले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी करून संबंधित प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर शैलेश मापारी यांनी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोबाइल टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
फोटो:
युवकाला खाली उतरविण्यासाठी धावपळ
रस्त्याची दुरुस्तीची मागणी करीत शैलेश मापारी हे सकाळीच मोबाइल टॉवरवर चढले. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मापारी यांना टॉवरवरून खाली उतरण्यासाठी गळ घातली, परंतु मापारी यांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी पूर्ण होईपर्यंत टॉवरवरून उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते टॉवरवरून खाली उतरले.