अकोला : वैमनस्यातून धारदार चाकूने भाेसकून दोघा जणांनी निबंधे प्लॉटमधील युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपी नंदू बगाडे (रा. लहान उमरी) याला अटक केली आहे. शहरातील लहान उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली उमेश अंबादास अटाळकर (३८, रा. निबंधे प्लाॅट,) हा बसलेला होता. दरम्यान आरोपी नंदू बगाडे व एक अल्पवयीन मुलगा आला. मद्यधुंद असलेल्या नंदू बगाडे याचा उमेशसोबत किरकोळ वाद झाला. यातून त्यांनी उमेशवर धारदार चाकूने हल्ला केला. उमेशच्या छाती आणि चेहऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने, परिसरातील नागरिकांनी त्याला ऑटोरिक्षामध्ये टाकून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी व त्याच्या मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुप्रताप मडावी पोलीस ताफ्यासह व स्थानिक गुन्हे शाखेचेही पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले.
युवकाच्या हत्या प्रकरणात आरोपी नंदू बगाडे नामक व्यक्तीस अटक केली आहे. किरकोळ भांडणातून ही हत्या झाली असून, पुढील तपास सुरू आहे.
-भानुप्रताप मडावी, ठाणेदार सिव्हिल लाइन पोलीस ठाणे
जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. हे मारेकरी रेल्वे पुलाजवळील भागातील रहिवासी असल्याचे समजते. नेमके या मारकऱ्यांमध्ये किती लोकांचा सहभाग आहे, हे अद्यापपर्यंत कळू शकले नाही. या सर्व मारेकऱ्यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार मारेकरी आणि मृतक उमेश हे सोबत होते अन् अचानक त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर हत्येपर्यंत पोहोचले. हा वाद सुरू असताना येथे उपस्थित असलेल्या नितेश नामक युवकाने मध्यस्थी करीत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाताला यामध्ये दुखापत झाल्याचे समजते.