लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री / चान्नी : पातूर तालुक्यातील चान्नी येथील ३२ वर्षीय युवक बुधवारी दुपारी १ वाजता विश्वमित्र नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला होता. त्याचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहामध्ये पडून वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली.नीलेश उत्तम अस्वार असे मृतकाचे नाव आहे. नीलेश अस्वार बुधवारी पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच, दिवानी येथील तरुणांनी दिवसभर नदीमध्ये शोध घेतला; परंतु मृतदेह आढळून आला नाही. तरुणांनी गुरुवारी सकाळपासून नदीमध्ये शोध मोहीम राबविली. अखेर नीलेश अस्वार याचा मृतदेह २४ तासानंतर गुरुवारी दुपारी नदीमध्ये अडकलेल्या अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच पातूरचे नायब तहसीलदार सय्यद ऐहसानोद्दीन, पोलीस प्रशासन त्वरित घटनास्थळी दाखल झाले. चान्नी, दिवाणी येथील सुरेश बर्डे, देवमन चराटे, शांताराम गाडगे, संगीत घुगे, नामदेवराव गायकवाड, सुपा टाके, अॅड. सुरेश पवार, राजू चराटे, किशोर अस्वार यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चान्नी येथील युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:05 AM