नरसीपूर पंचगव्हाण, ता. तेल्हारा येथील खुशाल देवराव खरपकार (२६) यांच्या तक्रारीनुसार २०१८-१९ मध्ये आरोपी माणिक चिंतामण गवारगुरू (रा. खकटा, ह.मु. तेल्हारा), नीलेश अरुण डोंगरे (रा. तेल्हारा) यासह इतर पाच अशा एकूण सात आरोपींनी संगनमत करून रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिकीट कलेक्टर पदाचे खोटे नियुक्तीपत्र व प्रशिक्षण देऊन १८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी २५ मे रोजी भांदवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१(३४), १२०(ब) नुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींपैकी पोलिसांनी माणिक चिंतामण गवारगुरू यास अटक करण्यात आली. २६ मे रोजी अटकेतील आरोपीस दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश तेल्हारा न्यायाधीशांनी दिले.
या प्रकरणातील अन्य सहा आरोपींचा तेल्हारा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी बुलडाणा, नागपूर जिल्ह्यातही अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. तेल्हारा तालुक्यातही आणखी काही युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्यांनी तेल्हारा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे या प्रकरणी तपास करीत आहेत.