--------------------------
तेल्हाऱ्यात घरफोडी; ३.२८ लाखांचा मुद्देमाल लंपास
तेल्हारा : शहरातील अरुण गोकुलचंद पाडिया यांच्या घरी दि. १७ व १८ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा एकूण ३.२८ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील राठी लेआऊट येथील रहिवासी अरुण गोकुलचंद पाडिया (वय ५९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी, मुलगा व सुनेसह शनिवार, १७ जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे गेले होते. त्यांनी जाताना घरातील कपाट, मुख्य दरवाजा व आवाराच्या फाटकाला कुलपे लावली होती. ते घरी नसल्याचा फायदा घेत शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कुलूप कोयंडा तोडून, घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने १२ ग्रॅ. किंमत ३६ हजार रुपये, अंगठी ४ ग्रॅम. किंमत १२ हजार रुपये, नथ २ नग ८ ग्रॅ. किंमत २४ हजार रुपये, पेंडाॅल सेट २ नग २० ग्रॅ. किंमत ६० हजार रुपये, बेसर १० जोड १० ग्रॅ. किंमत ३० हजार रुपये, चांदीचे शिक्के १० नग १०० ग्रॅ. किंमत ७ हजार रुपये, चांदीचे ग्लास ३ नग ३० ग्रॅ. किंमत २ हजार रुपये, चांदीचे जोडवे १० जोड १०० ग्रॅ. किंमत ७ हजार रुपये, नगदी १ लाख ५० हजार रुपये, असा एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत.