सत्तेवर येण्यासाठी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येताच पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत प्रचंड वाढ करीत ७० वर्षाचे रेकॉर्ड मोडित काढले. मोदी सरकारने जनतेसोबत केलेल्या विश्वासघाताच्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी सर्वत्र 'विश्वासघात आंदोलन' करण्यात आले. अकोला महानगर युवक काँग्रेसच्यावतीने अकोला शहरात पेट्रोलपंपांवर हे आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यात प्रशासनाने कलम १४४ लावल्यामुळे ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास मनाई केलेली असल्यामुळे ५ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनाचे आयोजन अकोला जिल्हा महानगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंशुमन देशमुख यांनी केले होते. आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, अंशुमन देशमुख, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण ताले पाटील, अकोला जिल्हा महानगर युवक काँग्रेसचे सचिव अक्षय इनामदार, अकोला शहर पश्चिम युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजल खान सहभागी झाले होते.
इंधन दरवाढींविरोधात युवक काँग्रेसचे विश्वासघात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:33 AM