अकोला : संसदेत पारित झालेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. संसदेत चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने अध्यादेश काढून शेतकरीविरोधी विधेयक पारित केल्याबद्दल अकोला जिल्हा युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. या निषेध आंदोलनामध्ये अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष महेश गणगणे यांच्यासह शहर युवक काँग्रेस अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.