अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यभर २ ते १५ आॅक्टोबर दरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यात १३ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता हॉटेल शहनाई येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे माहिती प्रदेश सचिव सागर कावरे यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. ‘गांधीजी मला भेटले’, ‘गांधीजी, जे मला समजलेले’, ‘गांधीवाद-वैश्विक शांततेसाठी सर्वोत्तम पर्याय’, ‘असहकार आणि छोडो भारत, या संकल्पनांची आज आवश्यकता आहे का?’ या विषयांवर ही स्पर्धा होणार असून, यासाठी भाषेचे बंधन नाही. इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा आहे. विजेत्यांना प्रथम - ३००१ रु., द्वितीय - २००१ रु., व तृतीय १००१ रु. असे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अंशुमन देशमुख यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला सागर कावरे, अंशुमन देशमुख, फैसल खान, अमोल काळणे आदी पदाधिकारी उपस्थित होेते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल सारवान, आकाश सिरसाट, शेख कलीम, सुमती गवई आदी कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.