अकाेला : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विराेधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदाेलन सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असताना भाजपचे मंत्री, आमदार जाब देत नसल्याचा आराेप करीत साेमवारी (दि.१४) युवक काॅंग्रेसच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांच्या निवासस्थानासमाेर ‘जवाब दाे’ आंदाेलन करण्यात आले.
नवीन कृषी कायद्याचा पंजाब, हरियाणासह राज्यातील शेतकरी विराेध करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण न करता भाजपचे मंत्री, आमदारांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे नमूद करीत युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, शहराध्यक्ष अंशुमन देशमुख यांनी साेमवारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांच्या निवासस्थानासमाेर आंदाेलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाविराेधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. आंदाेलनात प्रदेश महासचिव विजयसिंग राजपुत, सागर कावरे, सागर देशमुख, राहुल येवले, प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, प्रदेश सचिव ॲड. विवेक गावंडे, राम डहाके, श्रेयस इंगोले, अमरावती जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, वाशिम जिल्हाध्यक्ष बाबूराव शिंदे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, आकाश कवडे, अंकुश पाटील, मिलिंद झामरे, नितीन चिंचोळकर, आकाश सिरसाट, अक्षय इनामदार, नीलेश चतरकर, गजानन आसोलकर,अंकुश गावंडे, अक्षय गणोरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पाेलिसांनी उपस्थित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.