अकोला : विधानसभा निवडणूक काळातील सुपर ६० अभियानाच्या यशानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आता सुपर १००० म्हणजेच ‘युवा जोडो अभियाना’चे रणशिंग फुंकले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिली.युवा जोडो अभियानांतर्गत आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व काँग्रेस विचारधारेत काम करण्यास उत्सुक असलेल्या युवतींना पक्षांमध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यातील १ हजार युवक व युवतींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचे काम युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे. राज्यभरात सर्वत्र राबविण्यात येत असलेल्या युवा जोडो अभियानाचे समन्वयक जिल्ह्यातही राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हाभरात युवक काँग्रेसची विचारधारा मान्य असलेले तसेच काँग्रेस विचारधारेत काम करण्याची आवड असलेल्या तरुणांशी संपर्क करून त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. शिवाय, त्यांना युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध दिली जाणार आहे. काँग्रेस पक्ष हा लोकशाही विचारांचा पुरस्कार करणारा पक्ष असून, विविध क्षेत्रात काम करणारे तरुण राजकीय अंगाने काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या युवकांनी या अभियानामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन युवक काँग्रेसचे राज्य प्रवक्ते कपिल ढोके यांनी केले. यासाठी युवकांनी प्रदेश सचिव सागर कावरे, निनाद मानकर, अकोला ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश गणगने, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंशुमन देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले. जे तरुण काँग्रेसमध्ये काम करण्यास उत्सुक असतील त्यांना प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे स्वत: भेटून पक्षात काम करण्याची संधी देतील अशा पद्धतीने आगामी काळात युवा जोडो अभियानांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सुपर १००० हा युवक व युवतींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रतिनिधत्व देणार असल्याची माहिती कपिल ढोके यांनी दिली.