अकोट : आजारी असलेल्या रुग्णाला उपचारार्थ अकोला येथे घेऊन जाणारी रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे रुग्णाचा उपचाराला पोहपचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना दि. २ एप्रिल रोजी अकोट-अकोला मार्गावर घडली. रोशन निरंजन पळसपगार (१९), असे मृत रुग्णाचे नाव आहे.
अकोट तालुक्यातील वणीवारुळा येथील रोशन निरंजन पळसपगार (१९) हा युवक आजारी असल्याने अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आला होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयाने (क्र. एमएच १४ सीएल ०८१३) १०८ रुग्णवाहिकेतून अकोला येथे पाठविले. अकोट-अकोला मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाने जात असताना पळसोद फाट्यानजीक रुग्णवाहिकाचे मागील चाक पंक्चर झाल्याने रुग्णवाहिका बंद पडली. रुग्णवाहिकेमध्ये पर्यायी स्टेपनी उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका जागीच बंद होती. दुसरा पर्याय शोधण्यास रुग्णवाहिकेला तब्बल २ तास ३० मिनिटे वेळ लागला. या वेळेत प्रकृती गंभीर असलेल्या रोशनचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेत पर्यायी व्यवस्था असती, तर वेळेवर रुग्णाला उपचार भेटून रुग्ण वाचला असता; परंतु रुग्णवाहिका सुसज्ज नसतानाही चालकाने निष्काळजी केल्याचे दिसून येत आहे. रुग्णासाठी अन्य वाहन उपलब्ध केले नसल्याने रुग्णवाहिकेतच युवकाला जीव गमावावा लागल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालयातून अकोला येथील रुग्णालयामध्ये घेऊन जात असतानाच रुग्णाची परिस्थिती खूप नाजूक होती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांकडून लिहून घेतले होते. रुग्णवाहिकेचे चाक पंक्चर झाले. दुसरी पर्यायी व्यवस्था नव्हती, तसेच दुसरी रुग्णवाहिका यायला वेळ लागल्यामुळे रुग्ण दगावला, अशी प्रतिक्रिया रुग्णवाहिकेसोबत असलेल्या डॉ. रेशमा कंकाळ यांनी दिली.
-------------------------------
अकोट-अकोला मार्ग आणखी कितींचा बळी घेणार?
अकोट-अकोला मार्गाची दुर्दशा झाली आहे. या मार्गाचे काम तातडीने करण्यासाठी कंत्राटदार दिरंगाई करीत आहे. रस्त्यावर गिट्टी, दगड पडलेले असून, अनेकदा वाहने पंक्चर होत आहेत. दरम्यान, रुग्णवाहिका पंक्चर झाल्याने युवकाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. अकोट-अकोला मार्ग आणखी किती जणांचा बळी घेणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे, तसेच रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा व कंत्राटदाराच्या कामचुकारपणामुळे अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.