अकोला : बोरगाव मंजू येथे खांबावर वीज जोडणीचे काम करीत असताना, २७ वर्षीय युवकाला जबर धक्का बसून त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना १३ एप्रिल २०२३ रोजी घडली. होती. युवकाच्या पत्नीने कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत, बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कंत्राटदार संजय गणेश झापर्डे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कारंजा तालुक्यातील अंतरखेड येथील रिता छगन चव्हाण (२३) यांच्या तक्रारीनुसार त्यांचे पती मृतक युवक छगन प्रकाश चव्हाण (२७) विद्युत कंत्राटदार संजय झापर्डे यांच्याकडे काम करायचे. परंतु त्यांनी आयटीआय प्रशिक्षण घेतले नव्हते. १० एप्रिल रोजी त्यांचा भाऊ राहुल राठोड रा. अंजनी बु. ता. बार्शिटाकळी याचे लग्न असल्याने लग्नाकरिता पती, दीड वर्षाच्या मुलीसह त्या अंजनी बु. येथे गेले होते.
१३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कंत्राटदार संजय गणेश झापर्डे रा. अकोला याच्याकडे वीज दुरूस्ती कामाला चुलत भाऊ व छगन चव्हाण हे बोरगाव मंजू येथे गेले होते. छगन प्रकाश चव्हाण हे खांबावर वीज पुरवठा जोडण्याचे काम करीत असताना त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यांना खासगी रूग्णालयात भरती केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वीज कंत्राटदार संजय झापर्डे यांनी महावितरण कंपनीची कोणतीही परवानगी घेतली नाही. ज्या ठिकाणी पती छगन चव्हाण काम करत होते.
त्या बाजूलाच ११ केव्ही उच्च दाबाच्या वाहिनीचा वीज पुरवठा बंद केला नव्हता. कंत्राटदाराने वीज सुरक्षा रोधक साधने सुद्धा पुरविली नाहीत. पतीच्या मृत्यूस कंत्राटदार संजय झापडे हेच जबाबदार आहे. असल्याचे रिता चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार बोरगाव मंजू पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.