- नापिकी, कर्जमाफीस अपात्र ठरल्यामुळे आले वैफल्य
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा: सततची नापिकी, कर्जमाफीस पात्र न होणे, शेतातील बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने वैफल्यग्रसत होऊन दहीगाव येथील युवा शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत दहीगाव अवताडे येथील युवा शेतकरी विजय महादेवराव काळपांडे (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या नावाने सहा एकर शेती आहे. त्यांच्या नावावर सेवा सहकारी सोसायटीचे सुमारे दीड लाख रुपये कृषी कर्ज होते. ३ जून रोजी त्यांनी फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. गावातील नागरिकांनी तत्काळ त्यांना अकोला येथील खासगी दवाखान्यात भरती केले; परंतु रात्री ८ वाजता त्यांचे निधन झाले. मंगळवारी दहीगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, तीन भाऊ, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.