तेल्हारा (जि. अकोला): तेल्हारा तालुक्यातील राणेगाव येथील युवा शेतकर्याचा खून झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. मुकुंदा गोपाल कुकडे (२४) हे मुत्युमुखी पडलेल्या शेतकर्याचे नाव आहे. मुकुंदा कुकडेचे तेल्हार्यापासून जवळपास दीड कि.मी. अंतरावर शेत आहे. तो सोमवारी शेतात गेला. मात्र संध्याकाळी तो जखमी अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी राणेगाव येथील शेतात धाव घेतली. मुकुंदाच्या छातीजवळ जखम झाल्याचे दिसून आले. जवळच चाकू आढळून आला. जखमी मुकुंदाला प्रथम तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, ठाणेदार शेख अन्वर, उपनिरीक्षक रामभाऊ भास्कर, नागोराव भांगे, गणपत जवळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी बाळकृष्ण बाबाराव कुकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तेल्हारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
युवा शेतक-याचा खून
By admin | Published: September 22, 2015 1:38 AM