म्हशीचाही पुलावरून कोसळून मृत्यू
पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील पुलावरील घटना
अकोला : पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळ असलेल्या रेल्वे पुलावरून हबीबनगर येथील रहिवासी युवक म्हैशी घेऊन येत असताना एक म्हैस रेल्वेखाली येत असल्याचे युवकास दिसताच त्याने म्हशीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, म्हैस पुलावरून खाली कोसळली, यावेळी युवकही म्हशीसोबत ५0 फूट उंची असलेल्या पुलावरून खाली कोसळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील हबीबनगर येथील रहिवासी गुलाम फय्याज गुलाम इरफान हे शुक्रवारी रात्री त्यांच्या म्हशी घेऊन घराकडे परतत असतानाच त्यांची एक म्हैस रेल्वे पुलावर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर उभी होती. यावेळी अचानक समोरून रेल्वे आल्याने या म्हशीचा रेल्वेखाली येऊन मृत्यू होण्याची शक्यता गुलाम फय्याज यांना दिसली. त्यांनी तातडीने धाव घेऊन म्हशीला रेल्वे ट्रॅकच्या खाली ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, म्हशीचा तोल जाऊन ५0 फूट उंच असलेल्या पुलावरून म्हैस खाली कोसळली. यावेळी म्हशीला बाजूला ओढण्याचा प्रयत्न करणारे गुलाम फय्याजही म्हशीसोबत पुलावरून खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. एका म्हशीला वाचवण्याच्या प्रयत्नात गुलाम फय्याज यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. गुलाम फय्याज गुलाम इरफान यांना गत काही दिवसांपूर्वीच एक मुलगा झाला होता. त्यांच्या मागे पत्नी व कुटुंबीय असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.