अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथील अब्दुल हमीद चौकात उभ्या असलेल्या एका युवकाची पोलिसांचा खबºया असल्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या हत्याकांडामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. एका महिन्याच्या कालावधीत ही चौथी हत्या असून, यामुळे अकोला जिल्हा हादरला आहे.नायगाव येथील अब्दुल हमीद चौक येथे शेख सिकंदर शेख युनूस (३०) रा. राजू नगर अकोट फैल हे उभे होते. यावेळी आरोपी अब्दुल रहेमान अब्दुल कुरेशी ऊर्फ बल्ली याने शेख सिकंदर यांच्यासोबत पोलिसांचा खबºया असल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद घातला. गोवंश तस्करीची माहिती पोलिसांना देत असल्याचा आरोप त्याने शेख सिकंदरवर केला. यामुळे दोघांमध्ये हाणामारी झाली असता आरोपी अब्दुल रहेमान अब्दुल कुरेशी याने शेख सिकंदर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यामध्ये शेख सिकंदर शेख युनूस हा गंभीर जखमी झाला. शेख सिकंदर शेख युनूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी असलेल्या शेख सिकंदर शेख युनूस यांना नागरिकांनी आणि पोलिसांनी उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादम्यान शनिवारी रात्री उशिरा शेख सिंकदर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अकोट फैल पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित हत्यांकाडामधील आरोपी अब्दुल रहेमान अब्दुल कुरेशी ऊर्फ बल्ली व रहेमान कुरेशी या दोघांना शिताफीने अटक केली. या घटनेमधील इतर चार आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. हत्याकांडाची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू भारसाकळे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. सदर घटनेप्रकरणी अकोट फैल पोलीस स्टेशमनध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.