अकोला : देशात इंधन दरवाढीने जतना होरपळून जात असताना, पंतप्रधानांचे विदेश दौरे चालू आहेत. हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? असा सवाल करीत रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा युवासेनेच्यावतीने सायकल व बैलगाडी रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा जाहीर निषेध करण्यात आला.
युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना विस्तारक जितेश जी. गुप्ता यांच्या सूचनेनुसार आमदार विप्लव बाजोरीया यांच्या नेतृत्वात रविवारी सकाळी सिव्हिल लाइन चौक येथून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘युवासेना जिंदाबाद’, ‘पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विजय असो’, ‘पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरची भरमसाठ दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहरातील विविध रस्त्यांनी मार्गक्रमण करीत या रॅलीची सांगता अशोक वाटिका चौकात करण्यात आली.