अंदुरा(अकोला): बाळापूर तालुक्यातील अंदुरा परिसरातून वाहत असलेल्या पूर्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून तोल जाऊन नदीत पडल्याने वाहून गेल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान घडली. स्थानिक रहिवासी असलेले शुद्धोधन देवराव डीगे वय 31 वर्षे असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव असून हा युवक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पूर्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरून तो नदी पात्रात कोसळला. नदीच्या पाण्याचा प्रवाह अतिवेगाने असल्याने तो युवक नदीच्या पुरात वाहून गेला. सदर घटनेची माहिती मिळताच ग्राम प्रशासन व व नागरिकांनी नदी परिसरात जाऊन शोध मोहीम सुरू केली. परंतु युवक सापडला नाही. सायंकाळी अंधार झाल्याने शोध मोहिमेत अडचण झाल्याने ही शोध रात्री उशिरा थांबविण्यात आली.
उद्या सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात येणार असल्याचे ग्राम प्रशासनातील तलाठी सतीश कराड, सरपंच पती संजय वानखडे, पोलिस पाटील ज्ञानदेव रोहणकर व कोतवाल राजू डाबेराव यांनी सांगितले.
ग्रामस्थांकडून बोटीची मागणी
पूर्णा नदीत वाहून जाण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने स्थानिक अंदुरा गावत जिल्हा प्रशासनाकडून एक बोट कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.