सिंदखेडराजा (जि. बुलडाणा), दि. १२: तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील बैल दलालीचे काम करणार्या इसमाचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मारेकर्यांनी सुनियोजित कट करून धडा वेगळे शिर केल्याने मलकापूर पांग्रा येथे तणाव निर्माण झाला होता. मलकापूर पांग्रा येथील बैल बाजारात दलालीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे इरफान खान अमजत खान (वय ४२ वर्षे) हे काही कामानिमित्त ११ सप्टेंबरला दुपारी १२ च्या सुमारास घराबाहेर पडले. रात्री १0 पर्यंंत घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी शोधाशोध केली; परंतु काहीच पत्ता लागला नाही. सकाळी ४ वाजता फिरायला जाणार्या लोकांना राज हॉटेलच्या काही अंतरावर रोडच्या बाजूला कुणाचा तरी मृतदेह धडावेगळय़ा अवस्थेत दिसून आला. मृताचे धड आणि शिर वेगवेगळे पडलेल्या अवस्थेत आणि चेहरा जाळलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटणे कठीण झाले होते; परंतु वस्त्रांवरून मृताची ओळख पटली. मृत हा मलकापूर पांग्रा येथीलच इरफान खान असल्याचे समजताच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जोपर्यंत आरोपीचा शोध लागत नाही, तोपर्यंंत मृताला कोणीही हात लावायचा नाही, असा पवित्रा लोकांनी घेतला होता; मात्र ठाणेदार नीलेश ब्राम्हणे यांनी घटनेचा तपास लावून आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यावर तणाव निवळला. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड, पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पो.कॉं.गणेश गाभणे यांसह पोलीस स्टेशनचे कर्मचारी तळ ठोकून होते. पोलिसांनी कलम ३0२, २0१ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
युवकाचा निर्घृण खून
By admin | Published: September 13, 2016 2:47 AM